| पेण | प्रतिनिधी |
देशभरात गणेशमूर्ती निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण या बाप्पाच्या नगरीवर मुसळधार पावसाने मोठा घाला घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेकडो गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेषतः हमरापूर विभाग, बोरी विभाग, पूर्व विभाग आणि वाशी विभागातील अनेक गणेशमूर्ती कारखाने पाण्याखाली गेले. तसेच पेण शहरातील कोमलपाडा, शंकर नगर, कुंभार आळी, भुंड्या पूल मार्ग, कासार आळी आणि गुरव आळी या परिसरांमध्येही अनेक कारखान्यांमध्ये पूराचे पाणी शिरले. तयार गणेशमूर्ती, अर्धवट तयार मूर्ती, प्लास्टर, माती, रंग, साचे आणि इतर कच्चा माल पाण्याखाली गेल्याने कारखानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
पेणमधील गणेशमूर्ती उद्योगावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो गणेशमूर्तींची मागणी पेणमधून पूर्ण केली जाते. मात्र, यंदाच्या पावसाने उद्योगालाच मोठा फटका बसला आहे. अनेक कारखानदारांनी अनेक महिन्यांच्या परिश्रमाने तयार केलेल्या मूर्ती काही तासांतच पाण्यामुळे खराब झाल्या.
यंदाच्या गणेशोत्सवाला आता अवघे दोन महिने शिल्लक असताना हे नुकसान कारखानदारांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. ग्राहकांना वेळेत मूर्ती पोहोचवण्यासाठी कारखानदारांना पुन्हा नव्याने काम सुरू करावे लागणार असून, दिवस-रात्र मेहनत घेण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. वाढलेला खर्च, कमी झालेला वेळ आणि खराब झालेला माल यामुळे गणेशमूर्ती उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त कारखानदारांनी शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. बाप्पाच्या नगरीवर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्ती कारागिरांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बाप्पाच्या नगरीवर पावसाचा घाला! शेकडो गणेशमूर्ती कारखाने पाण्याखाली
