| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील पोस्ट ऑफिस विदारक स्थितीत आहे. या टपाल विभागाच्या कार्यालयातून नेरळ परिसरातील 70 हून अधिक गावांचा कारभार होतो. त्या टपाल कार्यालयाच्या भिंती सततच्या पावसाच्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत आहे. या परिस्थितीमुळे इमारत धोकादायक बनली असून, कधीही कोसळू शकते आणि कार्यालयाचे वेळेत ही घटना घडली तर मोठा अपघात होऊ शकतो.
नेरळ येथील खांडा भागात असलेल्या भारतीय टपाल कार्यालयाची इमारत सध्या अत्यंत जीर्ण आणि दयनीय अवस्थेत आहे. तालुक्यातील कळंब पासून अर्ध्या भागाचा कारभार याच कार्यालयातून होतो. येथे पोस्टच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतीच्या बाहेरील भिंतींचे प्लास्टर ठिकठिकाणी निखळले असून, काही भाग कोसळल्यामुळे ही वास्तू पूर्णपणे असुरक्षित आणि दुर्लक्षित दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात तर या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. इमारतीच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने ग्राहकांच्या रांगेत उभे राहण्याच्या जागेवरच पाण्याचे डबके साचत आहे.
यामुळे पोस्टाच्या कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, टपाल खात्याची महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य भिजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धोकादायक अवस्थेमुळे कधीही एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या जागेची पाहणी करून इमारतीची डागडुजी व दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. अशी कामे तात्काळ हाती अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेरळ शहर माजी अध्यक्ष सुभाष नाईक यांनी केली आहे.
पावसामुळे नेरळच्या टपाल कार्यालयाला भेगा
