। दापोली । वृत्तसंस्था ।
दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दापोलीत दमदार हजेरी लावल्याने दापोली खेड या दोन तालुक्यांना खाडी पट्टयातून जोडणार्या उन्हवरे व वावघर गावादरम्यान असलेला उन्हवरे कॉजवे हा पाण्याखाली गेल्याने दापोली खेड तालुक्यातील खाडी पट्टयातील गावामधील होणारी वाहतूक ठप्प आहे.
दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळून खेड तालुक्यातील खाडी पट्टयातील गावांकडे जाणार्या दापोलीहून खेड तालुक्याला खाडी पट्टयातून जोडणार्या रस्त्यावरील उन्हवरे वावघर गावादरम्यानचा कॉजवे पाण्याखाली गेल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत हा मार्ग बंद पडला होता. त्यामुळे खेड आणि दापोली तालुक्यातील खाडी पट्टयात राहणार्या लोकांची गैरसोय झाली आहे.
दापोलीत रविवारी रात्रीपासून कोसळणार्या पावसाच्या कोसळधारेने सोमवारी नदी ,नाले, ओढे पुराच्या पाण्याचे लोट आल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. अनेक गावातील रस्त्यातील छोटे नाले, ओढे परे हे पाण्याने भरून गेले होते. त्यामुळे गावांतर्गंतही वाहतुक बंद पडली होती. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने घेतलेल्या उंसतीमुळे भात शेतीच्या लावणीची कामे रखडलेली होती. रविवारी पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी रखडलेल्या लावणीची कामे पुन्हा सुरू होतील, त्यामुळे शेतकरी आनंदला होता. मात्र, सोमवारी पावसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. नद्या, नाले, ओढ्यांना पूर आल्याने शेतीची कामे करता आली नाहीत. रस्त्यावर आलेल्या पाण्याने सर्व रस्ते बंद पडल्याने सर्वांचीच गैरसोय झाली.