पहिल्याच कसोटीत पावसाचा खेळ

भारताच्या विजयावर पाणी
| इंग्लंड | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 98 षटकांमध्ये 157 धावांची आवश्यकता होती. परंतु, पावसामुळे सामना होऊ शकला नाही.

दरम्यान, पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. परंतु, पाऊस ओसरण्याऐवजी त्याने अधिक जोर धरला. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय संघांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला आहे. दरम्यान, पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसर्‍या डावात शतक ठोकणार्‍या जो रुटला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पहिल्या डावात इंग्लंडला 183 धावांमध्ये रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसर्‍या डावात इंग्लंडने 303 धावा जमवल्या. पहिल्या डावात भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसर्‍या डावात भारताला 121 षटकांमध्ये 209 धावांचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवसअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणार्‍या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्‍वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद होते. शेवटच्या दिवशी भारताला 98 षटकांमध्ये 157 धावा करण्याचे लक्ष्य होते. परंतु, पावसामुळे खेळ सुरु करता आला नाही. परिणामी, उभय संघांमध्ये पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे.

Exit mobile version