दुबईतील पावसाचा भारतीय खेळाडूांना तडाखा

ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या आशा मिळणार धुळीस?

| दुबई | वृत्तसंस्था |

दुबईत झालेल्या वादळी पावसामुळे आलेल्या महापुराचा फटका भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजीत कालाकल यांना बसला आहे. बिशकिक येथील आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी ते वेळेत जाऊच शकले नाहीत. किर्गिस्तानची राजधानी असलेल्या बिशकिक येथे ही स्पर्धा आजपासून सुरू झाली. आजच्या पहिल्या दिवशी खेळाडूंची वजने होणार होती. परंतु पुनिया आणि कालाकल यांचे दुबईतून विमान उशिरा आल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत.

पुनिया आणि सुजीत यांनी कसातरी मार्ग काढून बिशकिक येथे दाखल झाले. परंतु, अनिवार्य असलेल्या वजन तपासणीसाठी ते हजर होऊ शकले नाहीत. अगोदरच तेथे दाखल झालेल्या भारतीय प्रशिक्षकांनी विनंती करूनही त्यांना वजन तपासणीत दाखल करून घेण्यास संयोजकांनी नकार दिला. पुनिया (86 किलो) टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवण्याच्या जवळ गेला होता. यंदा त्याच्यासह कालाकल (65 किलो) पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याच्या आशा अधिक होत्या. या ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठी ही दुसरी सर्वात मोठी स्पर्धा आहे.

या आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी पुनिया आणि सुजीत रशियातील दागेस्तान येथे (दि.2) ते (दि.15) एप्रिलदरम्यान तयारी करत होते. माकांचकाल ते बिशकिक असा दुबई मार्गे त्यांचा प्रवास होता. ज्या वेळी दुबईत पावसाने हाहाकार माजवला, त्याच वेळी ते दुबईत होते. या पात्रता स्पर्धेस मुकल्यानंतर आता त्यांच्यासमोर मे महिन्यात तुर्की येथे होणारी अखेरच्या पात्रता स्पर्धेचा पर्याय शिल्लक राहिला आहे.

Exit mobile version