रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत संततधार


संगमेश्‍वर,राजापूरला मुसळधार पावसाचा दणका
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गेले काही दिवस दुपारनंतर जोर धरणार्‍या पावसाचा रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात जास्त प्रभाव जाणवत असून रत्नागिरीसह संगमेश्‍वर आणि राजापूर या तीन तालुक्यांना या पावसाने दणका दिला आहे.

या तिन्ही तालुक्यांमध्ये सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासात प्रत्येकी चार इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. वेगवान वार्‍याबरोबर पावसाचा जोर वाढत गेला. याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्‍वर तालुक्यातील साखरपा परिसरात बसला. मध्यरात्रीच्या सुमारास काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी भरण्याची शक्यता लक्षात घेऊन दुकान चालकांनी वेळीच साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले. सोमेश्‍वर मोहल्लयात पाणी शिरले. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणार्‍या पुलावरुन पाणी गेल्याने रस्ता बंद केला. मात्र एक मोटारसायकल स्वार (एमएचएएफ-4216) पाण्यातून पुढे जात होता. प्रवाहामुळे गाडी वाहून जाऊ लागली. त्याला एनडीआरएफसह ग्रामस्थांनी वाचवले. तर एक चारचाकी गाडी वाहून गेली. त्यातील प्रवासी आधीच उतरल्याने वाचले.

रत्नागिरी तालुक्यामध्ये दहा ठिकाणी दरडी कोसळल्या, तर वीसहून जास्त घरांना पुराचा फटका बसला. रात्रभर धुमाकूळ घालणारा पाऊस पहाटे थांबला. या तुलनेने जिल्ह्याच्या उत्तर भागातील पाचही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले.रत्नगिरी तालुक्यातील हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळून चार वाडयांशी संपर्क तुटला ह. पानवल येथे तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. वार्‍यामुळे येथील एका घराचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले. निवळी येथे चार ठिकाणी डोंगरातील माती घरापर्यंत आली होती. मुंबई-गोवा चौपदरीकरणाची माती निवळी-उपळेकडे जाणार्‍या मार्गावर पसरली. शिवरेवाडीतही डोंगरातील माती पाण्याबरोबर आल्याने रस्ता वाहतुकीला बंद होता. संगमेश्‍वर वायंगणीत कोसळलेली दरड हटवण्याचे काम सोमवारी सायंकाळपर्यंत चालू होते. तळेकांटे स्त्यावरील मोरी खचल्याने, तर संगमेश्‍वर येथे रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक खंडित होती.

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरीतील अनेक नद्यांना पूर आला. वेगवान वार्‍यासह कोसळणार्‍या पावसाने हातखंबा नागपूरपेठ परिसरातील ग्रामस्थांची रात्रीच्या अंधारात त्रेधातिरपिट उडवली. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी वाढले आणि किनार्‍यावरील घरांच्या अंगणापर्यंत पोचले. काहींच्या पायरीला पाणी लागले होते. तासाभरानंतर ते ओसरले. पण घरात पाणी शिरेल असा कुणालाही अंदाज नव्हता. काही समजण्याच्या आत अंधारात अचानक पाण्याचा लोंढा आला आणि घरांना वेढा घातला.

Exit mobile version