रायगडकरांनो सावधान! पुढिल 3 दिवस धोक्याचे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी (दि. 30) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रियस्थिती असून तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता राहील. त्यामुळे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ/सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज रायगड जिल्हासाठी ओरेंज इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. विशेषतः मच्छिमार बांधवानी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही समस्या असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलिबाग 02141-222097/ 8275152363 येथे संपर्क साधावा.

Exit mobile version