मत्स्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा; शेकडो बोटी किनारी विसावल्या
| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेले दोन दिवस तुफानी वाऱ्यांसह पाऊस धो- धो पडत असल्याने ऐन नवरात्रोत्सवात जनजीवन विस्कळीत झाले असून, बाजारपेठ ठप्प झाली आहे. दरम्यान, समुद्रात वारा व लाटा असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुरुड किनारी शेकडो बोटी विसावल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्यापर्यंत वादळ सांगितल्याने परवा सकाळी बोटी पुन्हा खोल समुद्रात जाणार आहे, अशी माहिती कोळी बांधव प्रकाश सरपाटील यांनी दिली.
दोन दिवसांत 97 मिमी इतक्या, तर आतापर्यंत 2526 मिमी पावासाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुरूड तहसीलदार कार्यालयातील संदेश वाळंज यांनी दिली.
राज्यात नवरात्रोत्सव सुरू आहे. तरुणांमध्ये उदंड उत्साह आणि आनंदाचा वातावरण असते. रोज रात्री भजन, गरबा दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात; परंतु पावासाने सर्व बट्ट्याबोळ करुन टाकल्याने भक्तगणांचा व तरुणांचा हिरमोड झालेला पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासांसाठी हवामानविषयक इशारा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार येत्या 24 तासात किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत 49 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा हा वेग 60 किमी प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे.
सर्व बंदरांवर स्थानिक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला असून, सर्व मच्छिमार सहकारी सोसायटीना तसेच व्हॉट्सॲप मेसेजद्वारेही कळविण्यात आले आहे की, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये.
अक्षय साळुंखे,
परवाना अधिकारी, मुरुड मत्स्यविभाग
मुरूड-खारअंबोली गावातील शेतकरी मनोज कमाने यांनी सांगितले की मुरुड शहरांसह पंचक्रोशी भागात यंदा शेतीयुक्त पाऊस चांगला पडला असला तरी आता पडणारा पाऊस शेतीला धोका देऊ शकतो. भातशेतीला करपा रोग लागू शकतो. हा पाऊस भाज्यांच्या मळ्यांना व बागायतदारांना नुकसान करु शकतो.
मनोज कमाने,
शेतकरी
