मंदोस चक्रीवादळामुळे रायगडात पावसाची शक्यता

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

हवामान खात्याच्या पूर्वसूचनांनूसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मंदोस चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाचा परिणाम म्हणून रायगडातही पाऊस पडण्याची शक्यता मध्यवर्ती वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसिल कार्यालय/पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या 02141-222097 / 2221188275152363 अथवा टोल फ्री क्रमांक 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जावू नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी/कापणीसाठी तयार असतील, तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे/भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काहीप्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहिल. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वार्‍यासह पाऊस पडत असताना नागरीकांनी खुल्या/मोकळया भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मंदोसमुळे तामिळनाडूत पाऊस
मंदोस चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडली असून ते वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात 55 ते 65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच संध्याकाळपर्यंत या वार्‍यांची गती मंदावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version