रायगडात मार्कांचा पाऊस

जिल्ह्याचा दहावी निकाल 99.73 टक्के,
राज्यात 99.95 निकाल
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा न घेताही जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी मार्कांचा पाऊस पाडला असून, राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के, तर रायगडचा एकूण निकाल 99.73 टक्के इतका लागला आहे.

विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.16) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 37 हजार 305 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 37 हजार 301 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. यामधील 37 हजार 202 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे डॉ. किरण पाटील यांनी अभिनंदन केले.

दहावीनंतर करिअरच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या दृष्टीने पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील शिक्षण घेताना जोमाने अभ्यास करावा व यश मिळवावे.
डॉ. किरण पाटील, सीईओ, रायगड

वेबसाईट हँग; विद्यार्थी त्रस्त
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना तीन वाजून गेले तरी अद्याप आपला निकाल पाहता आलेला नाही. दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट तब्बल दोन तास उलटूनही अद्यापदेखील डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट हँग का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


पुणे 99.96,
नागपूर 99.84,
औरंगाबाद 99.96,
मुंबई 99.96,
कोल्हापूर 99.92,
अमरावती 99.98,
नाशिक 99.96,
लातूर 99.96,
कोकण 100.

Exit mobile version