भोंदुगिरीचा म्होरक्या किरण धनवीला अटक ; रोहा पोलिसांची बेधडक कारवाई
| धाटाव | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील धामणसई हद्दीतील अघोरी जादूटोणा प्रकरणातील संशयित म्होरक्या किरण धनवी व एका सहकाऱ्याला अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.
पैशाचा पाऊस पाडणारा, भगतगिरी प्रकरणातील रत्नागिरीतील मुख्य म्होरक्या व त्याचा साथीदार अजून सापडले नाहीत. याबाबत उलटसुलट चर्चा असतानाच शाळा संबधीत किरण धनवी व एका सहकाऱ्याला अखेर अटक केल्याने पैशाच्या पावसाचे धागेदोरे अधिक उलगडणार असल्याचे बोलले जात आहे. यामागे राजकीय व अन्य लोक आहेत का, किती लोकांची आर्थिक फसवणूक झाली, नरबळीचा प्रयोजन होता का? अशा अनेक धक्कादायक प्रश्नांची उत्तरे मिळतील? अशी चर्चा सध्या जिल्हाभर सुरु आहे.
धामणसई हद्दीत काळया अघोरी विद्येच्या जादूटोणातून पैशाचा पाऊस पाडण्याचे भगतगिरी प्रकरण उघडकीस आले. धामणसई येथील धाडसी तरुणांनी पैशाचा पाऊस, त्यासाठी नरबळीची शक्यता हे भयानक प्रकरण रोखले. यातील सहभागी आरोपी संतोष पालांडे, प्रदीप पवार, प्रवीण खांबल, सचिन सावंतदेसाई, दीपक कदम, मिलिंद साळवी सर्व रा.रत्नागिरी व राजेंद्र तेलंगे रा.हेटवणे रोहा यांना ग्रामस्थांनी पकडून रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अघोरी विद्येतील पैशाच्या पावसासाठी चक्क विद्येचे ठिकाण लहान मुलांची शाळा वापरण्यात आली. शाळेत काळी बाहुली यांसह सर्वच जादूटोण्यातील पुरावे मिळाले. यातील भगत हा शनिवारी रात्री स्मशानात नग्नपुजा करणार होता. त्याचवेळी शाळेत बसलेल्या सर्व आरोपींना पैशाच्या पावसातून रग्गड पैसा मिळणार होता. त्यासाठी आरोपींनी भगतासाठी लाखो रुपये मोजले, हे समोर आले आहे. त्याचवेळी शाळेचा प्रमुख किरण धनवी हा संशयीत म्हणून चर्चेत आला. त्याच्याच बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये पैशाचा पाऊस पाडणारा जालीम भगत काही दिवस राहत होता. याही चर्चेने किरण धनवी प्रत्यक्ष सहभागी असावा. त्यातच अघोरी विद्येसाठी शाळा का वापरायला दिली, अशा सर्वच धागेदोऱ्यांसाठी अखेर धनवी याला रोहा पोलिसांनी अटक केली, असे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले.