राज्यात बहुतांश भागांत पावसाची विश्रांती

| पुणे । वृत्तसंस्था ।
पावसाला पोषक कमी दाबाचा पट्टा तसेच बाष्पाचा पुरवठा कमी झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुढील काही दिवस विश्रांती घेणार आहे. केवळ कोकण विभागात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-पश्‍चिामेकडील आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस होणार आहे.

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्‍चिम-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस नोंदविला गेला आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र काही भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. उर्वरित राज्यात गेल्या दोन आठवड्यांमध्ये सरासरीनुसार पाऊस नोंदविला गेला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर-पश्‍चिामेकडील राज्यांत सरकले आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोरही ओसरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस कोकण विभागातच पावसाची शक्यता आहे. इतरत्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. कोकण विभागातही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतच काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी होतील. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश भागात पावसाची विश्रांती असेल.

Exit mobile version