रायगडात परतीच्या पावसाचे थैमान

भातशेतीसह मासेमारी संकटात
। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
परतला, परतला असे म्हणता म्हणता रायगडात सध्या पुन्हा विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळू लागल्याने शेतकरी आणि मच्छीमार धास्तावले आहेत. हत्ती नक्षत्राचा हा पाऊस जड पाण्याचा पाऊस म्हणून ओळखला जातो, अशी माहिती मुरूड तालुक्यातील वाणदे गावचे जेष्ठ शेतकरी तुकाराम पाटील आणि तेलवडे या गावचे ग्रामस्थ कृष्णा वारगे यांनी शुक्रवारी दुपारी बोलताना दिली.
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे या पावसाने रायगडातील बहुतांश भागात थैमान घालून भातपीकाची दाणादाण उडविल्याचे वृत्त आहे.

नवरात्र संपताच या जड पाण्याच्या पावसाने आपले रुप दाखवून मी अजून परतलो नाही हेच दाखवून हवामान खात्याला देखील जणू चक्रावून टाकले आहे. कोणाचा अंदाज खरा मानायचा, असा प्रश्‍न अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे. समीर उर्फ राजेंद्र चंद्रकांत मांढरे या सामाजिक कार्यकर्त्यानेे माणगाव, महाड येथून शुक्रवारी बोलताना सांगितले की, गुरुवारपासून येथे जोरदार पाऊस पडत असून भातशेती झोपवून टाकली आहे.

या पावसामुळे भातच नव्हे तर साधे गवत देखील जमिनीवर लोळण घेते, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी दिली. मुरूड तालुक्यासह दक्षिण रायगड जिल्ह्यात या पावसाने धुमाकूळ घातला असून पारंपरिक भात शेतीला झोपवून टाकल्याचे दिसत आहे. भातशेतीचा दाणा भरण्यासाठी हा सिझन महत्त्वाचा असतो; परंतु जोरदार पावसामुळे भात पिकावर आलेली फुले गळून पडू शकतात. परिणामी भाताचा दाणा पोंजा होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती तुकाराम पाटील यांनी दिली. आता पावसाचा कोणताही भरवसा नसल्याने शेतकर्‍यांना मोठे दडपण आले आहे. हवामानाचे अंदाज देखील सपशेल चुकत आहेत.


मासेमारी देखील संकटात
सध्या मुरूडच्या उथळ समुद्रात पद्मदुर्ग जलदुर्गाच्या आसपास कोळंबी आणि बोंबील मासळीचा हंगाम सुरु असतानाच पावसाचे संकट उभे ठाकल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे एकदरा गावचे मच्छिमार ललित मढवी यांनी सांगितले. पूर्वेकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे मासळी खोल समुद्रात जात असून मच्छिमारांचे नुकसान होत आहे. राजपूरी येथील मच्छिमारांना कोळंबी, ढोमी अशा प्रकारातील मासळी भरपूर मिळूनही सुकविण्यासाठी ऊन नसल्याने खराब झालेली मासळी फेकून द्यावी लागल्याची माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली. म्हणजेच रायगडात पारंपरिक मासेमारी आणि भातशेती संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. मुरूडच्या मार्केटमध्ये शुक्रवारी पापलेट, सुरमई ,रावस अशी मोठी मासळी दिसत नव्हती. फक्त बोंबील आणि कोळंबीच आधिक दिसून येत होती. मुरूड तालुक्यात पाऊस सुरू आहे. तयार भाताची वाताहत होण्याची शक्यता देखील ठिकठिकाणी व्यक्त होत आहे.


पाच जिल्ह्यांना फटका
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील शेती पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचे तर काही भागात काढलेल्या सोयाबीनसह कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Exit mobile version