राज्यात पाऊस परतला; मुसळधार पावसाचा अंदाज

| मुंबई | प्रतिनिधी |

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दोन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मुंबई शहर तसेच उपनगरांत पुन्हा दमदार हजेरी लावली. मुंबई सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन–तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने ‌‌व्यक्त केली आहे. शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना तसेच संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version