दुसऱ्या सामन्यातील पराभवाने चाहते नाराज
| दक्षिण आफ्रिका |वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला टी-20 पावसामुळे रद्द झाला, त्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या टी-20 मध्ये पावसामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 19.3 षटकांत सात गडी गमावून 180 धावा केल्या. सहा धावांवर दोन गडी गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. तिलक 29 धावा करून बाद झाला. त्याचबरोबर सूर्याने 36 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. यानंतर जितेश शर्मा एक धाव काढून बाद झाला. उपकर्णधार रवींद्र जडेजा 14 चेंडूत 19 धावा करू शकला. रिंकूने 39 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. 19.3 षटकांनंतर पावसाने व्यत्यय आणला आणि सामना थांबवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन फलंदाज बाद केले . तर मार्को जॅनसेन, लिझाड विल्यम्स, शम्सी आणि मार्कराम यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.
पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 13.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. रीझा हेंड्रिक्सने 27 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. मॅथ्यू ब्रिट्झकेने 7 चेंडूंत 16 धावा, कर्णधार मार्करामने 17 चेंडूंत 30 धावा, डेव्हिड मिलरने 12 चेंडूंत 17 धावा केल्या. त्याचवेळी, ट्रिस्टन स्टब्स 12 चेंडूत 14 धावा आणि फेहलुवूकवायो 4 चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून मुकेश कुमारने दोन फलंदाज बाद केले. सिराज आणि कुलदीपला प्रत्येकी एक गडी बाद केला. मालिकेतील पुढील सामना 14 डिसेंबर रोजी होणार आहे.