| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
यावर्षी मे महिन्याच्या 20 तारखेलाच कोकणामध्ये पावसाने सुरुवात केली. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचा जवळजवळ एक महिना वाया गेला होता. नाहीतर साधारण जून महिन्याच्या 10 तारखेला पावसाला सुरुवात होते. तोपर्यंत पर्यटन चांगल्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या ठिकाणच्या व्यवसायिकांना देखील चांगला रोजगार उपलब्ध होतो. परंतु, यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्याने पाऊस लवकर थांबेल, अशी आशा सर्व पर्यटन व्यवसायिकांना होती. परंतु, अद्याप देखील सप्टेंबर महिन्याची 24 तारीख उजाडली तरी पाऊस थांबायचे नाव घेईना. त्यामुळे पर्यटकांचे येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यासह हरिहरेश्वर, काळभैरव मंदिर, दिवेआगरचा समुद्रकिनारा व त्या ठिकाणी असलेले सोन्याच्या गणपतीचे मंदिर हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. परंतु, मे महिन्यात सुरूवात केलेल्या पावसाने अद्याप थांबायचे नाव न घेतल्याने येथील पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तसेच, श्रीवर्धन तालुक्यात प्रामुख्याने पर्यटनासह मच्छीमारी हे व्यवसाय नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहेत. 1 ऑगस्ट रोजी मच्छीमारीवरील शासकीय बंदी उठल्याने मच्छीमारीला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल होऊन समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारी बंद होती. मागील आठ ते दहा दिवसांपासून चांगल्या प्रमाणात मच्छीमारी सुरू आहे. परंतु, पर्यटक येत नसल्याने मच्छि विक्रिचे प्रमाण्ाही घटल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी साधारणपणे नवरात्रोत्सवाच्या काळात पाऊस अंतिम टप्प्यात आलेला असतो. परंतु, यंदा नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतरही मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे गरबा नृत्य करणाऱ्या भाविकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच दरम्यान, पर्यटन व्यवसायिकांनी आपापली हॉटेल्स, रिसॉर्ट पूर्णपणे सज्ज ठेवले आहेत. या महिन्याच्या अखेरीस पर्यटन व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होईल, असा विश्वास पर्यटन व्यवसायिकांमधून व्यक्त केला जात आहे.







