राज्यात पावसाचा जोर वाढणार

| मुंबई | प्रतिनिधी |

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 26 जुलै रोजी उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, त्याचा परिणाम कोकणासह राज्यातील विविध भागांवर होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे 17 सेंमी, तर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 15 सेंमी पाऊस झाला. त्यामुळे रायगडसह कोकण पट्ट्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांमध्ये पाणी साचणार नाही, यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, असा कृषी सल्ला देण्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस, आले आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, समुद्रातही वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन समुद्रात जाण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version