। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शेतकर्यांसाठी वरदान असणारा मान्सून अर्थात मोसमी पाऊस यंदा सरासरीच्या 98 टक्के म्हणजेच सर्वसाधारण बरसणार असल्याचा अंदाज हवामानाबद्दल माहिती देणार्या स्कायमेट या संस्थेने दिला आहे. मोसमी पावसाचे हे दुसरे पूर्वानुमान आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी 880.6 मि.मी. आहे. दरवर्षी या आकडेवारीशी तुलना करून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सरासरीइतका, म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. यंदाचा मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 98 टक्के इतका बरसणार आहे.
गेल्या दोन वर्षी मोसमी पावसावर ला निनाचा प्रभाव होता. तत्पूर्वी, ला निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटला. मात्र, पूर्वेकडून येणार्या वार्यांची गती अधिक असल्याने ला निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल निनोची शक्यता नाही, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील. यंदाचा मान्सून शेतीसाठी चांगला असेल. कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल. यामुळे शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे.
ला निना आणि अल निनो म्हणजे काय?
प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला ’अल निनो’ म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस कमी पडतो. याउलट, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला ‘ला निना’ म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस अधिक पडतो.