| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये मंगळवारी (दि.18) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे माथेरान पर्यटनस्थळी दाखल झालेल्या पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. माथेरानमध्ये वर्षारंभ झाला असून माथेरानमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पर्यटकदेखील भिजून चिंब झालेले रस्त्यावर दिसत होते. बालगोपाळांसह आबालवृद्धांनीदेखील भिजून चिंब होत पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.
जून महिना अर्ध्यावर आला तरी पावसाने काही हजेरी लावली नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र माथेरान परिसरात ढगाळ वातावरण होत होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. मागील काही दिवसात टप्याटप्याने हलक्या ते मध्यम सरी बरसत होत्या. अधूनमधून पावसाने उघडीपसुद्धा दिली. वातावरणात चांगलाच बदल होऊन अधिक गारवा निर्माण झाला. माथेरान पर्यटनस्थळी येणारा पर्यटक हा पावसाळ्यातील गारवा अनुभवण्यासाठी अधिक प्रमाणात येत असतो. जून महिन्याच्या मध्यावर माथेरान पर्यटनस्थळी दाखल झालेल्या पर्यटकांनी येथे निसर्गाचा मनमुराद आनंद घेत येथील थंड आल्हाददायक वातावरणात व बरसणार्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटत घोड्यावरून रपेटदेखील केली. पावसाला चांगलीच सुरवात झाली असून ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. आता या पुढे येथे माथेरान पर्यटनस्थळी वर्षा पर्यटनाला सुरूवात होणार आहे. वर्षा पर्यटनासाठी माथेरान हे एक उत्तम पर्यटनस्थळ असून या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला पर्यटक अधिक पसंती देताना दिसणार आहेत.
मुंबईत उकाड्याने हैराण झालो होतो म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब माथेरानला आलो. शनिवार आणि रविवार येथे जास्त गर्दी असल्याने आम्ही येथे मधल्या दिवसांत येणे पसंत केले. सकाळी आम्ही माथेरानमध्ये दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये आम्ही सर्वांनी मनसोक्त, मनमुराद भिजण्याचा आनंद घेतला. माथेरानमधील वर्षा पर्यटनाला सुरवात झाली असून येथील हे वर्षा पर्यटन खूपच आल्हाददायक आणि येथील निसर्गसौंदर्य खूप मनमोहक आहे.
अनिल शिंदे, पर्यटक, मुंबई





