पावसामुळे रत्नागिरीत जनजीवन विस्कळीत

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर दिवसभर कायम होता. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने जोर धरल्यामुळे गणेशभक्तांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असून रत्नागिरी जिल्ह्याला यापूर्वीच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिवसभर कोसळणार्‍या संततधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते जलमय झाले. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांनाही त्रास सहन करावा लागला. दिवसभर झोडपून काढणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात 240 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वी 3134 मिमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे चिपळूण, रत्नागिरी, खेड, लांजा, राजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे रत्नागिरीकर चिंतेत आहेत. गणेशोत्सवही चार दिवसांवर आला असून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार 8 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version