जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चिपळूणसह जिल्हावासियांच्या मनात धडकी भरवली आहे. सतत कोसळणार्‍या पावसामुळे दापोली आणि चिपळूणचा परिसर जलमय झाला. दापोलीत 24 तासात विक्रमी 315 मिमी पाऊस पडला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरण आणि कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जुलैच्या पूरातून वाचलेली उर्वरित शेतीही या अतिवृष्टीने आडवी झाली. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. साकवांचे नुकसान झाले. दापोलीतील हर्णे बंदरात एक मच्छिमार नौका भरकटली आणि अखेर वाळूत रुतली. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अतिवृष्टीच्या सावटाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडणगड तालुक्यातील मौजे दापोली पाजपांढरी येथे वासुदेव हशा दोरकुळकर यांच्या मालकीची बोट आंजर्ले खाडीत बुडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोटीवरील सहा खलाशी सुखरूप बाहेर आले. मौजे काळकाई येथे गावात पाणी शिरले होते. ते पाणी आता ओसरले आहे. मौजे रुपनगर येथेही पाणी शिरले आहे. मौजे जालगाव समर्थ नगर, लष्करवाडी, चैतन्यनगर, भाटकर हॉस्पिटल व ब्राह्मणवाडी गणपतीमंदिर परिसरात पाणी शिरले आहे. चिपळूण तालुक्यातील वेलदूर नवानगर धोपावे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 156 मिमी तर एकूण 1404.10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 132 मिमी, दापोली 315.40 मिमी. खेड 151.50 मिमी, गुहागर 158.80 मिमी, चिपळूण 209 मिमी, संगमेश्‍वर 162.70 मिमी, रत्नागिरी 104.90 मिमी, राजापूर 62.60 मिमी. लांजा 108 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या इशार्‍यानुसार 7 ते 11 सप्टेंबर दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरीकांना सुरक्षितता आणि सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version