परतीच्या मुसळधार जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली, चिंता मिटली

| रायगड | खास प्रतिनिधी |

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून येत्या 25 सप्टेंबरनंतर माघारी फिरण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी पावसाच्या दमदार सरी बरसल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अवघ्या काही कालावधीत पडलेल्या पावसाने अलिबाग शहरातील सखल भागात पाणी साचले होते. पावसाने समाधानकारक सरासरी गाठल्याने चिंता मिटली आहे. शुक्रवारी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. तो शनिवारीदेखील कायम राहणार आहे. यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला होता. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. त्यानंतर काही अपवाद वगळता पाऊस बऱ्यापैकी बरसा होता. मान्सूनला परतीचे वेध लागले आहेत. जाता-जाता तो राज्याच्या विविध भागांमध्ये बरसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्के अधिक, म्हणजेच 98 टक्के बरसल्याने त्याने कोटा पूर्ण केला आहे. अनंत चतुर्दशीला पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी सकाळपासूनच आभाळ आल्याने दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मान्सून परतण्याच्या तयारीत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला तर पावसाळा लांबतो आणि याचा थेट परिणाम शेतीवर होतो.

Exit mobile version