पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले

। अलिबाग । वार्ताहर ।
कार्लेखिंड परिसरात बागायतदारांची सध्या आंबा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पाऊस पडल्यास आंबा पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये रिमझीम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आंबा काढणी सुरू असताना पाऊस आल्यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मे महिना संपत आला असून कोकणातील हापूस आंब्याचा हंगामही शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांवरही आता शेवटच्या बहरातील फळे शिल्लक राहिली आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेवटच्या हंगामातील झाडावर असलेला आंबा अडचणीत आला आहे, असे व्यावसायिक सांगत आहेत.

आंब्याला पाणी लागले, तर आंबा खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणून हा आंबा सांभाळण्यासाठी बागायतदार शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या भीतीमुळे झाडावरील आंबा काढून तो पेटीत सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग आता वाढली आहे. आता कोकणात झाडावर हंगामातील शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. हा आंबा पिकत येण्यापूर्वी दोन ते तीन दिवसांनी खाली उतरवला जात आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या आठवड्यापासून अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. वातावरणही ढगाळ राहत आहे. पावसाचे थेंब पडून आंबा खराब होऊ शकतो. ढगाळ वातावरण असले, तरी आंब्यावर त्याचा परिणाम होत आहे, असे आंबा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. हंमागातील शेवटच्या दिवसातील आंबा चांगल्या स्थितीत बाजारात पाठवला तरच त्याचा फायदा होणार आहे. या वर्षी पाऊसही लवकर दाखल होणार आहे. त्यातच अधूनमधून शिडकावा होत आहे.

Exit mobile version