| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काही आठवड्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधू आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.





