राजा भाऊ ठाकूर यांना उत्स्फुर्त प्रतिसाद

आवास जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आवास येथील जिल्हा परिषद मतदार संघातून महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार राजा भाऊ ठाकूर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी दाखविल्यापासून मतदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणूकीत ते भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. मात्र, या मतदार संघात विकास कामे करण्यास प्रशासन अपयशी ठरले. रस्ते, पाणी प्रश्न आजही सोडविण्यास ही यंत्रणा अपयशी ठरली. सत्तेत असणाऱ्यांनी देखील सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम केले, त्यामुळे राजाभाऊ ठाकूर यांनी पुन्हा या दंडेलशाहीविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. राजाभाऊ ठाकूर हे माजी आमदार दिवंगत मधुकर ठाकूर यांचे सुपूत्र आहेत. आपल्या वडीलांचा वारसा घेत जनसामान्यांसाठी काम करणारे ते एक नेतृत्व आहे. सत्तेत नसतानाही जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी काम केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ते कायमच पसंतीला उतरत आहेत. रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांची जिल्हा परिषदेच्या आवास मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवड जाहीर करण्यात आली. शेकापचे नेते जयंत पाटील यांची सोमवारी (दि.20) सकाळी शेकाप भवन येथे भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पाठींबा दर्शविला.

राजाभाऊ ठाकूर यांची जिल्हा परिषदेच्या आवास मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यांना आतापासूनच कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. जनसामान्यांमध्ये राहणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ ठाकूर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version