आ. राजन साळवी कुटूंबियांसाह अलिबाग लाचलुचपत कार्यालयात दाखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आमदार राजन साळवी यांची बेकायदा मालमत्ताप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबागमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. मंगळवार (दि.18) रोजी आ. राजन साळवी, त्यांची पत्नी, भाऊ व दोन मुले व त्यांचा सीए अशा सहा जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात ते दाखल झाले. तब्बल पाच तास त्यांची आणि कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. बुधवार (दि.19) रोजीदेखील चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आ. राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यांच्याविषयी, तसेच कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशीचा ससेमिरा शिंदे सरकारने डिसेंबर 2022 पासून सुरु ठेवला. त्यानंतर 20 जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. पुन्हा त्यांना चौकशीसाठी कुटुंबियांसमवेत हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार 18 एप्रिल रोजी राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा साळवी, भाऊ दीपक साळवी, मुलगा शुभ व अर्थव तसेच सीए असे सहा जण चौकशीसाठी अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षक कार्यालयात 11:20 मिनिटांच्या सुमारास दाखल झाले. साडेअकरा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरुच होती. 

Exit mobile version