| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आ.राजन साळवी यांची सोमवारी (दि.5) अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणामध्ये अडकविण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरु केलेला आहे. यापूर्वी अॅड. अनिल परब, वैभव नाईक यांनाही अशाच चौकशांना सामोरे जावे लागले आहे. आता राजन साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेले आहे. साळवी यांच्या मालमत्तेसंदर्भात चौकशीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या चौकशीतून नेमके काय साध्य होणार आहे हे चौकशी अंती समजणार आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलिसांच्यावतीने शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोमवारी साळवी दाखल झाल्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.