राहुल गांधींचा मोदींसह केंद्र सरकारवर निशाणा , भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता
| मुंबई | प्रतिनिधी |
आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली. कारण, आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि अग्निवीरचा प्रश्न… हे सगळे मुद्दे आज माध्यमांमध्ये दिसत नाहीत. ईव्हीएममध्ये राजाचा आत्मा राहतो. आज राजाचा आत्मा देशातील प्रत्येक संस्था, ईडी आणि सीबीआयमध्ये आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईतील सभेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाहीत. राहुल गांधींनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोग ईव्हीएममधून बाहेर पडणाऱ्या स्लिप्सशी जुळवून घेण्यास का तयार नाही, असा सवाल केला. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा असल्याचे ते म्हणाले. ते एक अभिनेता आहेत. तसेच ते एक पोकळ व्यक्ती असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईत समारोप झाला. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या सभेतून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महासभेसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला, आप नेते सौरभ भारद्वाज, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह 15 इंडिया आघाडीचे 40 हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत झाली.
मोदी की गॅरंटी चालणार नाही : पवार
देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही, याच मुंबईतून महात्मा गांधींनी चलो जाओ म्हणत इंग्रजांना हकलून लावलं होते. पण, आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार करीत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ज्यांनी देशाला वेगवेगळे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यांच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. दबाबतंत्राविरोधात आपल्याला लढलं पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि सर्व घटकांचा हिरमोड केला आहे. तुम्हाला त्यांच्याकडून आश्वासने दिले जातील, पण तुम्ही बळी पडू नका, असे आवाहनही पवार यांनी केले.
हुकूमशाहीचा अंत करण्याची वेळ आलीय : ठाकरे
अब की बार भाजप तडीपार हा नारा मी दिलेला आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकूमशहा कितीही मोठा तरी ज्या वेळेला सगळे एकवटतात तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. ही वेळ आता आलेली आहेस, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. भाजप हा एक फुगा आहे. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते, त्या फुग्यात आम्ही हवा भरली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. भाजप 400 पार म्हणतात हे काय फर्निचरचे दुकान आहे का?, असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींच्या कुटुंबात ते आणि त्यांची खुर्चीच आहे. तोच मोदींचा परिवार आहे. घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार हवे आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास जर का तोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, तर आपल्यात फूट पाडणाऱ्याला तोडा, फोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. अबकी बार भाजप तडीपार हा नारा मी देतोय. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. हातात मशाल घेऊन रणशिंग आपल्याला फुंकायचं आहे. मुंबईतून जेव्हा एखादी घोषणा होते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरून चालतो. म्हणून लोकशाही रक्षणाच्या लढाईची सुरुवात होत आहे. ज्यांना फोडलंत ती देशाची जनता नाही. देशाची जनता आमच्यासोबत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करायचा प्रयत्न करा. तुम्हाला तोडूनमोडून टाकण्याची शपथ घेऊन मैदानात उतरलो आहोत, असा वज्रनिर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.
गांधी आडनावाची भाजपला भीती
या देशाने गांधी या आडनावाच्या व्यक्तींची परीक्षा घेतली. महात्मा गांधी असो की इंदिरा गांधी असो की राजीव गांधी त्यांना परीक्षा द्यावी लागली. रक्त सांडावं लागलं. तुमच्या नावामागे गांधी आडनाव आहे. त्यामुळे तुम्हाला त्रास दिला जात आहे. या आडनावाला भाजप घाबरत आहे, असं पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाल्या. त्यांना 400 पार करायचं आहे. कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. त्यांना तुमचा मताचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. त्यांना चीनसारखी हुकूमशाही आणायची आहे, असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी करीत मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘महाराष्ट्र सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर‘
महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढे लोक बसले आहेत. त्यातील एकही नेता नाही. ते फक्त डीलर आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाने मते घेतात आणि भाजपाशी डिलिंग करतात. शरद पवार यांच्या नावाने मत घेतात आणि भाजपशी डिलिंग करतात, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे आहे. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्टरी आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलरही आहेत. मोदी यांनी आमच्या काकालाच पळवलं. मोदी सर्वांची गॅरंटी देतात. ते आमच्या काकांची (नितीशकुमार) यांची गॅरंटी देऊ शकतात का?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला. बिहारमध्ये यावेळी आश्चर्यकारक निकाल आम्ही आणून दाखवू. मीडियाने काहीही दाखवू द्या, सर्व्हेत काहीही दाखवू द्या, आम्ही जिंकून दाखवू. मोदींनी पाच वर्षात पाच लाख नोकऱ्या तरी दिल्या का? मोदींनी काहीच केलं नाही. राहुल गांधी यांनी मोहब्बतची दुकान सुरूच ठेवावी. उद्या सत्तेत आलो नाही आलो तरी आपण जनतेत गेलं पाहिजे, असं मत तेजस्वी यादव यांनी व्यक्त केलं.
‘इंडिया झुकेगा नही..’
षड्यंत्राद्वारे माझ्या पतीला जेलमध्ये टाकण्यात आलंय, पण काहीही झालं तरी मी सांगू इच्छिते की झारखंड झुकेगा नही, अशी डरकाळी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांनी मुंबईत फोडली. त्या म्हणाल्या, की आज या मंचावर इंडिया उत्तर पासून ते दक्षिणापर्यंत लोक इथं एकत्र आले आहे. आता रात्र झाली आहे, मोठ्या संख्येनं लोक इथं उपस्थिती आहे. तुमचं प्रेम, तुमचे आशिर्वाद येणाऱ्या काळात आमच्यासाठी असू द्यावे, जेणे करून तानाशाही सरकार पाडता येऊ शकतं. महाराष्ट्रात सुद्धा माणसं विकत घेतली जात आहे. पण मी एक सांगू इच्छितेच तुम्ही घाबरू नका, लढलं पाहिजे. झारखंडमध्ये एक वाक्य फेमस आहे, झारखंड झुकेंगा नही.. आज या शिवाजी पार्कवर मी या सरकारला सांगतेय, इंडिया झुकेंगा नही, इंडिया रुकेंगा नही.