राजस्थान रॉयल्स अंतिम विजेता

। पुणे । प्रतिनिधी ।

राजस्थान रॉयल्स संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाला 1 गडी राखून पराभूत करतना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येणार्‍या इकोल टी-20 करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

शिंदे हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत, अष्टपैलू संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी मित राठोडने फटकेबाजी करताना 36 चेंडूत 3 चौकार व 6 षटकारांच्या सहायाने 61 धावांची खेळी केली. त्याला अश्कन काझीने 30, हर्ष संघवीने 22 धावा करताना सुरेख साथ दिली. ओंकार राजपूतने 3 तर केदार बजाज, निमिर जोशी, साव्या गजराज, निलय नेवासकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

केदार बजाजने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाने 20 षटकांत 9 बाद 165 धावा करताना विजय साकारला. केदार बजाजने 10 चेंडूत नाबाद 33 धावा करताना 4 षटकार मारताना संघाला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. स्नेहल खामणकरने सर्वाधिक 40, ओंकार राजपूतने 22, मेहुल पटेल 21, निलय नेवासकर 18 धावांचे योगदान दिले. अमित राठोडने 4, दीपक डांगी व अश्कान काझी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामनावीर पुरस्काराने केदार बजाजला सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम फलंदाज अष्टपैलू स्पोर्ट्सच्या सागर पवारला, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अष्टपैलू स्पोर्ट्सच्या दीपक डांगीला तर मालिकावीर म्हणून राजस्थान रॉयल्स अकादमीच्या साव्या गजराजला सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version