| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुन्हा नवा पुतळा तयार करून बसवण्यात आलेला राजकोट किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये राजकोट किल्ला असून, आता तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यातच करण्यात आले होते. मात्र, या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचा प्रकार समोर आला होता. पुतळ्याच्या चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्तीच्या कामामुळे आता हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चौथऱ्याच्या सभोवती पदपथाची दुरुस्ती आवश्यक असून, इतर कामे पूर्ण होईपर्यंत किल्ला बंद राहणार आहे. 22 जूनपासून पर्यटकांना किल्ल्याच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
दरम्यान, किल्ला बंद ठेवण्यात आल्यानं पुन्हा एकदा सरकारवर उद्घाटनाच्या घाईवरून टीका केली जातेय. तर माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारला सवाल विचारला आहे. गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसं पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीनं किल्ला बंद ठेवलाय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 100 कोटी खर्चून 100 वर्षे टिकेल असा पुतळा केल्याचं सरकार सांगतंय. पण आता पर्यटकांसाठी किल्ला बंद केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अजूनही लक्ष घालावं आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. सिंधुदुर्ग, मालवणमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी राजकोट किल्ला बंद केल्यानं नाराजी व्यक्त केलीय. किल्ल्याच्या दरवाजावर येऊन पर्यटकांना परतावं लागत असल्यानं पर्यटकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, दुरुस्तीचं काम पूर्ण होताच किल्ला पुन्हा खुला करण्यात येणार असल्याचं बांधकाम विभागाने सांगितलं आहे.







