| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात अनमोल अशा औषधी वनस्पती आहेत. परंतु, दैनंदिन लागत असलेल्या आगीत या वनसंपदा नष्ट होताना दिसत आहेत. मुरुड तालुक्यातील राजपुरी गावाजवळी डोंगरावर मंगळवारी (दि.6) रात्री वनवा लागला.
वणव्यांमुळे हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक होत असून आगीमुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे कृती आराखडा नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केला जात आहे. वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आणि अद्ययावत तांत्रिक साह्य नसल्याने जंगले जळून खाक होत आहेत.
वणवे रोखण्यासाठी जंगल क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती आणि वनपाल-वनरक्षक स्तरावरील वनकर्मचार्यांना पुरेसे मनुष्यबळ आणि अद्ययावत यांत्रिक साह्य उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला मानवनिर्मित वणवे लावण्यास सुरुवात होते. वणव्यांमुळे वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत.