राजपुरी समुद्रकिनारी लाटांचे तांडव

। मुरूड-जंजीरा । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यात वादळी पावसाची संततधार सुरू असून खाडीपट्ट्यात बिगरयांत्रिक मासेमारी देखील बंद करावी लागली आहे. समुद्रकिनार्‍यावर कधी मुसळधार वादळी पाऊस तर कधी वादळी वारे असे वातावरण असून रविवारी 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान तालुक्यातील राजपुरी समुद्रकिनारी दुपारच्या सुमारास मोठी भरती आल्याने समुद्राच्या लाटा आठ फुट उंच उसळत होत्या. याबाबत माहिती देताना राजपुरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी सांगितले की, वादळी वारे, पौर्णिमा, अमावस्या जवळ आली की समुद्रात लाटांचा जोर वाढतो. याला कोळी बोली भाषेत पाणी फुगून मोठी भरती येते असे म्हटले जाते.

यावेळी या लाटांची उंची वाढून किनार्‍यावर दीड ते दोन तास जोरदारपणे धडकत असतात. राजपुरी येथील श्री बाळ गणेश मंदिरासमोरील किनारी काँक्रीट चौथर्‍यावर सुमारे 8 फुट उंच उसळणार्‍या लाटांचे तांडव धडकी भरविणारे असले तरी समुद्राच्या भरतीचे उधाण मच्छीमार आणि राजपुरी ग्रामस्थ किनार्‍यावरून पाहत होते.

Exit mobile version