| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण-शीळफाटा रस्त्यावर शनिवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि त्यामुळे कोंडीत अडकले आहेत. भावाकडे रक्षाबंधनसाठी निघालेल्या लाडक्या बहिणी देखील या कोंडीत अडकल्या. तीन ते चार तास वाहने कोंडीत अडकून पडली होती. सर्वसामान्य नागरिकांसोबतच रुग्णवाहिकांना देखील याचा फटका बसला. यावर मनसे नेते राजू पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण-शीळफाटा रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने दररोज सकाळ संध्याकाळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होते. देसाई खाडी ते पलावा जंक्शन, काटई नाका, विको नाका हा भाग वाहनांनी पूर्णपणे व्यापलेला असतो. पलावा जंक्शन येथील वाहन कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी ते काटई नाका या नवीन पुलाची उभारणी करण्यात आली. यामुळे पलावा जंक्शन मधील कोंडी कमी होईल, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. मात्र, शनिवारी रक्षाबंधनला हा दावा देखील फेल ठरला. यावर मनसे नेते राजू पाटलांनी ट्विट करत मोठी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना ट्रॅफिकचं आंदण आहे. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तेच ट्रॅफिक, तीच घुसमट आणि तीच मागणी. आता आम्हालाही त्याच त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे. परंतु, यांना नागरिकांच्या जीवाची, वेळेची आणि जीवनाची काहीही एक पडलेली नाही. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी पुल बांधले. त्याचा मलिदा खाऊन झाला. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली. म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, वाहतुक कोंडीचा प्रश्न काही केल्या या आमच्या ‘बालकमंत्र्याला’ सोडवता येत नाही. कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत. हवाईमार्ग आहेत. रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर आहेत. पण सामान्य माणसाचं काय? असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.





