। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील ग्रामपंचायत घाणेखुंटचे सरपंच राजू ठसाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी आपल्या मानधनाचे सर्व पैसे गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकास कामांसाठी देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
ग्रामपंचायत घाणेखुंट सरपंच राजू ठसाळे यांच्यावतीने नेहमीच आदर्शवत व नवनवीन उपक्रम राबविले जातात.ठसाळे यांनी गेले 2 वर्षे विविध शाश्वत विकासाच्या व पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा हातात घेतल्या आहेत. त्यांनी ‘एक वाढदिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत जय भवानी मित्र मंडळाच्या माध्यमातून ठसाळे यांनी सन 2008 पासून गावातील मराठी शाळा तसेच अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. यावेळी सरपंच राजू ठसाळे यांनी शासनाकडून मिळणार्या मानधनाची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी न वापरता ती गोळा करून सुमारे गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक खर्चासाठी दिली आहे. त्यांच्या या निस्वार्थी आणि अभिनव उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.






