| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी माथेरान नगरपरिषदेच्या 20 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. माथेरान शहरात धनगर समाजाची मोठी वस्ती असून, धनगर समाजाचे नेतृत्व करणारे राकेश कोकळे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम धनगर समाजाकडून राबविले जात आहेत. त्याचवेळी माथेरान जंगलात पर्यटकांनी टाकलेले प्लास्टिक तसेच अन्य टाकाऊ साहित्य हे जंगलातील विविध भागात जाऊन, प्रसंगी दरीमध्ये उतरून ते सर्व प्लास्टिक काढण्याचे कार्य राकेश कोकळे यांच्याकडून गेली चार वर्षे अविरत सुरु आहे. त्याचवेळी माथेरान शहरात धनगर समाजाच्यावतीने दसरा उत्सव साजरा करण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्य त्यांच्याकडून केली गेली आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणूकीमध्ये राकेश कोकळे यांनी प्रभाग सहामधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवरून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.







