उरण | वार्ताहर |
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखीही यंदा महागाईच्या फेर्यात अडकली आहे. गतवर्षी 10 ते 15 रुपयांना असणारी राखी यंदा 20 ते 25 रुपयांवर गेली आहे.
बाजारपेठेत पारंपरिक गोंड्याच्या राख्यांऐवजी डोरेमन, छोटा भीम, लायटिंगच्या राख्यांची क्रेझ आहे. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, मोती, रुद्राक्ष, सुंदर व आकर्षक राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहे. शहरातील सराफा बाजारातही चांदी आणि सोन्याच्या मुलामा दिलेल्या राख्या उपलब्ध आहेत. उरण शहरात बाजारपेठ रंगीत राख्यांनी सजली आहे. बहीण आपल्या लाडक्या भावासाठी कोणती सुंदर व आकर्षक राखी आवडेल त्याकडे लक्ष देऊन राख्या खरेदी करताना दिसत आहेत. भारतीय डाक विभागाच्या वतीने राखी विशेष अशी सेप्रेट व्यवस्था करण्यात आली आहे. वेगळी व्यवस्था केल्याने राखी पोस्टाने पाठविण्यात त्रास होत नाही.
बहीण-भावाच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्यांनी जोडणार सण म्हणजे रक्षाबंधन. महिलांसाठी हा सण म्हणजे भावनिक जपणूक ओलावा देणार आहे. सध्या ब्रेसलेटसारख्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. 10 ते 15 रुपयांपर्यंत असणार्या राख्या आता 20 ते 25 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
सध्या बाजारात आलेल्या राख्या गुजरात आणि सुरत येथून उपलब्ध झाल्या आहेत. राख्यांचे विविध प्रकार, विविध आकार आहेत. दिवसेंदिवस नवनवीन प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही राख्या विकण्याचा धंदा करीत आहोत. 10 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत आम्ही राख्या विकतो. गोंडा राखी व देवाची राखी 20 रुपये डझन या भावाने आम्ही विकतो, असे दिनेश वाघरी यांनी सांगितले.
आता ऑनलाइनच्या जमान्यातील बाजारपेठही व्यापक झाली आहे. खडे, मोती, गोंडा, रेशीम धागा, प्लॅस्टिकची फुले, मॉडर्न डिझाईन, आणि मॉडर्न लुक असलेल्या असंख्य राख्या ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. दोनशे रुपयांपासून तीन हजार आणि यापेक्षाही अधिक किमतीच्या राख्या विक्रीसाठी आहे. मोरपीस, अमेरिकन डायमंड चादी, गोल्ड प्लेटेड, वुडन असे अनेक प्रकार यामध्ये उपलब्ध आहे.