आदिवासी बांधवांना मायेचा आधार
| रायगड | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड कोसळून इतिहासजमा झाली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या इर्शाळवाडीमध्ये विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित, प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांमुळे आनंदाचा क्षण अनुभवता आला. शासनाने इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. आता चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांच्या हातात राखी बांधून मायेचा आधार दिला.
राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मुलींनी ‘हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने केली. इयत्ता चौथीच्या मुलींनी तेथील सर्व दादांना राखी बांधली. भूतकाळ आम्ही बदलू शकत नाही, परंतु येणाऱ्या भविष्यात जर तुमच्यावर कोणते संकट आले, तर ही राखी तुमचे रक्षण करणार आहे. असा संदेश चिमुकल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटला होता.
इर्शाळवाडीच्या तात्पुरत्या कंटेनर वसाहतीमध्ये रक्षाबंधन सोहळ्यासाठी खालापूर अप्पर तहसीलदार पूनम कदम, मंडळ अधिकारी तुषार कामत, चौक तलाठी माधव, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, संस्थेच्या कार्याध्यक्ष व प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर अध्यक्षा शोभा देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा, योगेंद्र शहा, देवानंद कांबळे, मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
इर्शाळवाडीमधील एका कुटुंबातील संपूर्ण परिवार दरडीच्या ढिगाऱ्याखाली गेला. त्या कुटुंबातील दोन लहान बहिणी आजच्या कार्यक्रमात होत्या. राखी पौर्णिमेचा सोहळा पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. वसंत नावाचा एक चार वर्षाचा मुलगा भेटला. याच्या कुटुंबातील 12 माणसे त्या ढिगाऱ्याखाली कायमचे गेले. त्या चिमुकल्याला राखी बांधून पवित्र बंधनाने त्याचे हरवलेले विश्व परत मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.