| नवी मुंबई | प्रतिनिधी |
गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज ठाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.
मनसे लोकसभेची निवडणूक न लढवता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत एम आय जी क्लब वांद्रे येथे बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना कोर्टाच्या निर्णयानंतरही मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
पहिल्या पाच वर्षातील गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याचा विरोध केला. 2014 च्या अगोदरची भूमिका ही निवडूण आल्यानंतर तिकडे भूमिका बदलू शकते. तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर त्याला धोरणांवरती टीका म्हणतात. त्यावेळी मी मुद्द्यावरुन टीका केली होती. त्यानंतच्या पाच वर्षात ज्या गोष्टी झाल्या त्याचं कौतुकही केले. राम मंदिराचा विषय मोठा होता. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभे करायचे नाही. पण १९९२ ते २०२४ पर्यंत रखडलेल्या गोष्टीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसते. हा विषय तसाच राहून गेला असता, असे राज ठाकरे म्हणाले.