खवय्यांसाठी चमचमीत खाद्यपदार्थांची पर्वणी
| माणगाव | प्रतिनिधी |
सध्या माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे रमजानचा उत्साह सुरु आहे. येथील हॉटेल रुहीमध्ये रोजा (उपवास) सोडण्यासाठी चमचमीत विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. हे चमचमीत खाद्यपदार्थ खवय्यांसाठी पर्वणी ठरत आहे. या हॉटेलचे मालक इम्तियाज धनसे हे गेली अनेकवर्ष हे हॉटेल चालवित असून हॉटेलमधील रुचकर व चवदार पदार्थांमुळे या हॉटेलचे नाव सर्वदूर पोहचले आहे.
रोजा सायंकाळी मगरीबच्या बांगीनंतर सोडला जातो. इफ्तारीसाठी मुस्लिम बांधवांच्या घरांतून विविध खाद्यपदार्थ दररोज बनविले जातात. त्यातच मोर्बा येथील हॉटेल रुही मधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला खवय्ये विसरत नाहीत. दरवर्षी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातून खवय्ये हे पदार्थ खरेदी करण्यासाठी मोर्बा येथे येत असतात. या रुही हॉटेलमध्ये खास रमजान निमित्त मावा जिलेबी, हलवा पराठा, रबरी, मालपवा, मँगो मालपोवा, ड्रायफ्रूट मालपोवा, व्हॅनिला फेरणी, मँगो फेरणी, जिलेबी रबरी, शाही तुकडा, मावा खाजा, ड्रायफ्रूट बर्फी, गुलाबजाम, चिकन तंदुरी, रगडा, भजी, वडा, चिकन सामोसा, पंजाबी सामोसा, चिकन रोल असे तोंडाला पाणी सुटणारे विविध खाद्यपदार्थ बनविले जात आहेत.
पहिल्या रोजापासून हॉटेल रुहीमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमध्ये खवय्ये पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. ग्राहकांना, खवय्यांना तत्पर सेवा देण्यासाठी हॉटेल मालक इम्तियाज धनसे हे जातीने लक्ष देऊन असतात.