रामकृष्ण हरी! संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी प्रस्थान

| आळंदी | वृत्तसंस्था |

श्री. क्षेत्र देहू ते पंढरपूर आषाढी वारीचा 339 वा पालखी सोहळा 28 जून ते 17 जुलै कालावधीत साजरा होत आहे. पालखी प्रस्थानासाठी हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीसाठीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी प्रस्थान वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल होत आहेत. यंदा मृग नक्षत्रातील पाऊस समाधानकारक असल्याने मराठवाडा विदर्भातील वारकऱ्यांचा उत्साह अमाप दिसून येत आहे. बहुसंख्येने या भागातील वारकरी दोन दिवसांपासून आळंदीत दाखल झाले आहेत.

सोयीसुविधांची तयारी पूर्ण
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने सोयीसुविधांची तयारी पूर्ण झाली आहे. कानाकोपऱ्यांतून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही व भोजनाची सोय
इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. मंदिरात आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
संस्थानने पालखी प्रस्थान सोहळ्याची रूपरेषा जाहीर केली आहे. मुख्य मंदिरात सकाळपासूनच दिंड्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मानाचे अश्व सज्ज असून, पालखी आणि रथाची सजावट करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी संत तुकाराम अन्नदान मंडळाने भोजनाची सोय केली आहे. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला आहे.
‘निर्मल वारी’चा संकल्प
संस्थान आणि नगरपंचायत यांच्या वतीने यंदाही ‘निर्मल वारी’चा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी स्वच्छतेच्या अनुषंगाने पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास ५०हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंद्रायणी नदीघाट, देऊळवाडा या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. गावात ठिकठिकाणी एक हजारांहून अधिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले असून, भाविकांसाठी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Exit mobile version