शेकाप नेते रामभाऊ कोशेंचे निधन

| रसायनी | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, नि:स्पृह, निष्ठावंत कार्यकर्ते, कधीही तत्त्वाशी तडजोड न करणारे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आयुष्यभर समाजसेवा करणारे रामभाऊ कोशे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाल्याने चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकनेते, माजी खासदार दि.बा. पाटील यांचे खंदे समर्थक, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांचे विश्वासू, वाजेकर शेठ, माजी आमदार सुमंतराव राऊत, माजी आमदार विवेक पाटील यांच्या साथीने त्यांनी अनेक चळवळीत भाग घेऊन समाजकार्य केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असल्याने त्यांना कर्जत येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम.जोशी यांनी रामभाऊ कोशे यांच्या घरी बैठक आयोजित केली होती. चौक येथील दूरसंचार केंद्र त्यांच्या प्रयत्नाने सुरू झाले. चौक प्रवाशी संघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. चौक परिसरातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी विद्या प्रसारणी सभा चौक या शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य होते. या संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून, अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. चौक येथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. 15 वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी चौक येथे ज्येष्ठ नागरिक सभागृह हे त्यांनी माजी आमदार विवेक पाटील यांच्या माध्यमातून उभे केले.

Exit mobile version