। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये यासंबंधित प्रश्नांवर पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम हे उपोषण करणार आहेत. पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये यांच्याबाबत हे उपोषण असणार आहे. त्यात कर्जत तालुक्यातील जुन्या तहसील कार्यालयाच्या टेकडीवरील इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय आहे. ते अद्याप नवीन प्रशासकीय भवन येथे हलविण्यात आलेले नाही. त्याचवेळी कचेरी येथील तहसील कार्यालयात असलेले रेकॉर्ड रूम अद्याप प्रशासकीय भवन येथे हलवण्यात आलेले नाही. त्याचा परिणाम जुने दस्त शोधण्यासाठी धावपळ होत असते. ‘चावडी’ व ‘फेरफार’ या योजनेअंतर्गत संगणकावरुन वितरीत करण्यात येणार्या सर्व उतार्यांच्या प्रतींवर प्रत्येकी 15 रुपये आकारले जातात. त्यातील पाच रुपये हे शासनाला जमा करावे असे निर्देश असूनदेखील करत तहसील कार्यालयाने ती रक्कम शासनाला जमा केलेली नाही.
वृद्ध सहाय्यक कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र त्यांना लाभ मिळाला नाही. त्या सर्व वंचित लाभार्थ्यांना अर्ज दाखल केल्यापासून आजपर्यंतचा लाभ तात्काळ मिळावा. या मागण्यांसह पाटबंधारे विभागातील उल्हास, पेज, चिल्लार, पाताळगंगा तसेच, नाले आणि कालव्यामधील अतिक्रमणे याबद्दल कार्यवाही व्हावी. या सर्व नद्यांमधून बेकायदेशीर पाणीउपसा केला जात असून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि नदी नाले या ठिकाणी होणारी बांधकामे त्वरित दूर करण्यात यावी, या मागण्यांसाठी उपोषण असणार आहे.