गणेशोत्सवापूर्वी तातडीने बंदोबस्त करा; शरदचंद्र पवार गटाचा प्रशासनाला अल्टीमेटम
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सध्या संपूर्ण कोकण पट्ट्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अगदी गावाकडच्या मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरांनी ठिय्या मांडला आहे. रात्रीच्या घट्ट अंधारात रस्त्याच्या मधोमध बसलेली ही गुरे वाहनचालकांना अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे भीषण आणि प्राणघातक अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. या मोकाट गुरांमुळे नुकतेच उरण येथे एका निष्पाप दुचाकीस्वाराला अत्यंत दुर्दैवीरित्या आपला जीव गमवावा लागला आहे. उद्या आणखी कोणाचा बळी जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे.
काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सणासाठी मुंबई-गोवा महामार्गासह इतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अगदी गावाकडच्या मुख्य रस्त्यांवरून मुंबई, पुणे आणि राज्यभरातून लाखो चाकरमानी आपल्या गावी कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची अभूतपूर्व गर्दी होणार हे उघड आहे. मात्र, रस्त्यांवर मोकाट गुरांनी मांडलेला ठिय्या चाकरमान्यांसाठी जिवघेणा ठरत आहे. रात्रीच्या घट्ट अंधारात रस्त्याच्या मधोमध बसलेली ही गुरे वाहनचालकांना अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे भीषण आणि प्राणघातक अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात गर्दीच्या वेळी आणखी भीषण अपघात होण्याची शक्यता वाहनचालकांमधून वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली, तर रस्त्यांवर रक्ताचा सडा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. अलीकडेच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतही या ज्वलंत प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने चाकरमान्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
दरम्यान, उद्या आणखी कोणाचा बळी जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यां थेट निवेदनाद्वारे तीव्र इशारा दिला आहे. त्यांनी या निवेदनातुन, सर्व महसूल व ग्रामविकास यंत्रणेने (तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी) आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या मालकांचा तात्काळ शोध घ्यावा. संबंधित गुरांच्या मालकांना कार्यालयात बोलावून लेखी पत्र द्यावे आणि गुरे रस्त्यावर मोकाट न सोडण्याबाबत दोन वेळा कडक इशारा द्यावा. आणि दोन वेळा समज देऊनही तिसऱ्यांदा तीच गुरे रस्त्यावर आढळल्यास ती तात्काळ जप्त करून गोशाळेत जमा करावीत आणि निष्काळजी मालकांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशा मुख्य तीन मागण्या केल्या आहेत.
ही मोहीम केवळ कागदावर आणि एसी केबिनमध्ये न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून राबवली पाहिजे. प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी तातडीने कारवाई केली नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र जन-आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील.
अझहर धनसे,
जिल्हा संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
