रानगव्याने वन विभागाला पळविले

| नेरळ । वार्ताहर ।

तालुक्यात गेली तीन दिवस मनुष्य वस्तीजवळ आलेला रानगव्याने वन विभागाच्या 40 अधिकारी कर्मचारी यांना आपल्या मागे पळविले. भरकटलेला रानगवा तीन दिवसापासून कर्जत तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात आढळून येत आहे. दरम्यान, सध्या हा वाट चुकलेला रानगवा रायगड आणि कर्जत तालुक्याच्या हद्दीवर असून त्याला कोणी जखमी करू नये यासाठी वन विभाग त्याच्या मागावर आहे.

चौक कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर 29 जानेवारी रोजी मध्यरात्री नजरेस पडलेला रानगवा 30 जानेवारी रोजी कोणाच्याही नजरेस पडला नाही किंवा दिसला नव्हता. चौक भागातून कर्जत कडे आलेला हा रानगवा 31 जानेवारी रोजी कर्जत नेरळ कल्याण रस्त्यावरील माणगाव गावामध्ये सकाळी नजरेस पडला. साडे दहाच्या सुमारास रानगवा पुढे रेल्वे मार्ग ओलांडून जिते आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सायंकाळी दिसू लागला. त्या रानगव्याला पाहण्यासाठी नेरळ कशेळे रस्त्यावर शेकडो लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पाहून घाबरलेला रानगवा अंधार पडेपर्यंत कोल्हारे गावाच्या हद्दीत गवत वाढलेल्या ओसाड शेतांमध्ये फिरत राहिला.

या सर्व काळात माणगावपासून माथेरान वन विभागाची टीम स्थानिक लोकांना रानगवा हिंस्त्र प्राणी नसल्याने त्याला कोणीही दगड मारण्याचा प्रयत्न करून हाकलून देवू नये, असे आवाहन मेगा फोन करून केले जात होते. माथेरान वनक्षेत्रपाल उमेश जंगम आणि नेरळ वनपाल एस एच म्हात्रे, माथेरान वनपाल डी जी आढे हे वनरक्षक आणि वन कर्मचारी यांच्यासह जनजागृती करीत होते. रात्री साडे अकरा वाजता हा रानगवा रात्री उल्हास नदी पार करून तळवडे गावाच्या हद्दीत असलेल्या वन नर्सरी मध्ये दिसून आला. त्यामुळे माथेरान वन विभागाच्या मदतीला कर्जत पश्‍चिम वन विभाग यांचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले होते. त्यात वनक्षेत्रपाल समिर खेडेकर, वनपाल जयवंत सुपे, कोकाटे, क्षीरसागर, माने यांनी आपली सर्व स्टाफ सह धाव रानगवाच्या मागे सुरक्षा कवच उभे केले. रात्री उशिरा पर्यंत रानगवा तळवडे दहीवळी असा आज सकाळी माले फराटपाडा असा साळोख पाझर तलाव परिसरात आढलून आला आहे. त्या पुढे काही अंतरावर ठाणे जिल्हा हद्द असून हा वाट चुकलेला रानगवा जिल्हा हद्द ओलांडण्याचे मार्गावर आहे. मात्र त्याच्या या प्रवासात कुठेही कोणत्याही स्थानिकांनी दुखापत केलेली नाही.

कोट
हा प्राणी हिंस्त्र नाही आणि कोणत्याही लग्न जनावराला मारून हत्या करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत नाही.त्यात जंगलातील केवळ तृण खावून जगणारा असल्याने कोणीही कोणत्याही प्रकारे त्रास देवू नये यासाठी वन विभाग माथेरान आणि कर्जत पश्‍चिम या विभागातील 40 अधिकारी कर्मचारी यांचा स्टाफ तैनात केला होता.
-उमेश जंगम
वनक्षेत्रपाल माथेरान

Exit mobile version