तुमची मुलगी काय करते?, स्वराज्य सौदामिनी ताराराणी मधील कलाकार सहभागी
नृत्यांगना सोनाली पवार यांच्या लावणीने वाढली शोभा
। संतोषी म्हात्रे । खोपोली ।
कृषीवल परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभासाठी शुक्रवारी (दि.8) खालापुरमध्ये मोठ्या संख्येने सर्व स्तरातील महिला, भगिनींनी हजेरी लावली हाती. खालापूरचा रस्ता कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी बहुसंख्येने महिलांच्या गर्दीने ओथंबून वाहत असल्यासारखे जणू काही नजरेस पडत होते.
स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेतील मुख्य भूमिका रंगवणारी स्वरदा ठिगळे हिने उपस्थित महिलांशी संवाद साधून उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचे आभार मानले. नृत्यांगना सोनाली पवार यांनी दिलखेचक लावणीनृत्य सादर करून सर्व महिलावर्गाची दाद मिळवली. महिला वर्गाशी संवाद साधताना कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांनी आपले ऋणानुबंध असेच अबाधित राहू देत अशा पद्धतीचे आव्हान करून सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. महिलावर्गाचा उत्साह पाहून दिलखुलासपणे सर्व कलाकारांबरोबर फोटोसेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
खालापूर तालुक्यातील सर्वच स्तरावरील आणि क्षेत्रातील महिला वर्गाने यावेळी सहभाग घेतला होता. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा ठाकरे, बालापुर तालुका पंचायत समितीच्या सभापती श्रद्धा साखरे, खोपोली नगरपालिकेच्या माजी नगरसेविका माधवी रिठे, मेघा वाडकर, रुपाली जाधव, श्री क्षेत्र वरद विनायक महड देवस्थानाच्या विश्वस्त मोहिनी वैद्य, माथेरान नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भाणगे, खालापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा सदस्या, विविध संस्थांच्या पदाधिकारी आणि गृहिणींनी या आयोजनात आपला सहभाग दर्शवला होता. आपण कल्पनाही केली नव्हती एवढ्या संख्येने महिला वर्गाची भरभरून साथ मिळाल्याचे या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या खालापूर नगर पंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले.
दरम्यान येथे केलेली व्यवस्था कमी पडली म्हणून महिला वर्गाने चक्क जमिनीवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत आयोजनाच्या हेतूला उस्फूर्त प्रतिसाद दिला. महिला वर्गासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि लकी ड्रॉ चे आयोजन देखील या निमित्ताने केले होते. स्टार कलाकारांच्या परफॉर्मन्स सोबत स्थानिक कलाकारांनी देखील सतेज परफॉर्मन्स करुन एकापेक्षा एक आविष्कार सादर केले तर आदिवासी समाजातील मुलींचे पारंपारिक नृत्य सगळ्यांना भावले. दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून जाणारे प्रवासी या अभूतपूर्व सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक करत होते. खालापुरात रंगला कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा