। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई शाळेमध्ये विद्यार्थी मतदान हा आगळा-वेगळा उपक्रम संकुलाच्या प्रांगणात शुक्रवारी (दि.19) उत्स्फूर्तपणे पार पडला. शाळेतील विविध विभागांतर्गत हे मतदान घेण्यात आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. मतदान प्रक्रियेमधून निवडून आलेल्यांची स्कूल कॅप्टन, स्कूल व्हाईस कॅप्टन, हाऊस कॅप्टन (ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस व यलो हाऊस) या पदांवर नेमणूक करण्यात आली.
या प्रक्रियेमध्ये मतदान कसे केले जाते, याविषयी माहिती मिळाली. सर्व मुलांनी मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांना मतदान प्रक्रियेचे ज्ञान व महत्त्व अवगत झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहित करण्यासाठी अलिबाग तालुक्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुरा शेलार, सहाय्यक पोलीस अधिकारी भारत फार्णे, होली चाईल्ड सी.बी.एस.ई. शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाझकर तसेच, अकॅडमी डायरेक्टर श्रुती सुतार, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उपस्थिती दर्शवली.
मतदान प्रक्रियेमधून निवडून आलेल्या स्कूल कॅप्टन, स्कूल व्हाईस कॅप्टन, हाऊस कॅप्टन यांनी शपथविधीनंतर आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच, नर्सरी ते दहावीच्या वर्गाचे प्री फेट यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्गाचे पालक प्रतिनिधी यांना सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुरा शेलार, सहाय्यक पोलीस अधिकारी भारत फार्णे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक अक्षय डाकी यांच्या मार्गदर्शना खाली मुलांनी संचलन व पिर्यामिडचे अत्यंत सुंदर सादरीकरण केले.