पीएनपी नाट्यगृहात रंगला विजयश्री 2022 चा सोहळा

राज्यस्तरीय एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा

। अलिबाग । सायली पाटील ।
अलिबाग नगरीतील ज्येष्ठ नाट्यलेखक व दिग्दर्शक स्व. विजय बारसे यांना अभिवादन म्हणून दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 20 फेब्रुवारीला विजयश्री ही स्पर्धा फ्रायडे फिल्म्स प्रोडक्शन, अलिबाग यांच्यातर्फे आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने तर अंतिम फेरी अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृहात पार पडली. या स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी दिग्दर्शक शेखर नाईक हे चोखंदळ परीक्षक म्हणून लाभले.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असतात. स्पर्धकांच्या व प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्पर्धेने अतिशय कमी कालावधीतच आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करत स्पर्धेच्या पाचव्या वर्षात पदार्पण केले. विजयश्री 2022 च्या अंतिम फेरीत एकपात्री अभिनयात विल्सन खराडे (पनवेल) प्रथम क्रमांक, अर्चना पाटील (पेण) द्वितीय क्रमांक तर द्विपात्री अभिनयात उमा कोर्लेकर व प्रतिक राक्षे (रोहा) प्रथम क्रमांक, पुजा चव्हाण व किर्ती घाग (मुंबई) द्वितीय क्रमांक असा निकाल लागला. प्रेमानंद गजवी यांना उत्कृष्ट लेखनाचा विशेष पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट विनोदी कलाकार अक्षता साळवी (मुंबई), विशेष सहभाग सन्मान सिद्धी पवार (अलिबाग) तर, निषाद एन्टरटेन्मेंटचे संचालक संकल्प केळकर यांना विशेष सन्मान देऊन त्यांच्या कला क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला. विजयश्री 2022 च्या सोहळ्याला चित्रा बारसे, विजय बारसे, विजया बारसे, चित्रलेखा पाटील, मानसी नाईक, स्नेहा आम्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

पीएनपी नाट्यगृह ही कलाकारांना कलाक्षेत्रात वर नेण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. मी स्वतः कलाक्षेत्रात शिक्षण घेतलं असल्याकारणाने मला हा विषय फार जवळचा आहे. तसेच, अटल करंडक गाजवलेली अलिबागची गुज एकांकिकेच्या प्रयोगासाठी पीएनपी नाट्यगृह मी मोफत देईन.

चित्रलेखा पाटील, अध्यक्षा, पी.एन.पी.सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळ
Exit mobile version