। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कशेळे भागात 15 जूनच्या रात्री रानगव्याचे दर्शन झाले. काहीसा लाजाळू असलेला हा प्राणी सहसा दिवसा नजरेस पडत नसून रात्री जंगलात फिरताना दिसतो. मात्र कशेळे सारख्या अल्प जंगल असलेल्या भागात रानगव्याचे दर्शन झाल्याने प्राणीमित्र आणि प्रेमीमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
अभयारण्य किंवा मोठ्या जंगलांमध्ये आढळणारा किमान एक हजार किलो वजनाचा रानगवा हा प्राणी 15 जूनच्या रात्री कर्जत तालुक्यातील कशेळे भागात अनेकांच्या नजरेस पडला. कशेळे-खांडस रस्त्यावर कशेळे गावाच्या बाहेर महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्र आहे आणि त्या ठिकाणी तेथील सुरक्षा रक्षक यांच्या बरोबर कशेळे गावातील चंदू राणे हे तरुण गप्पा मारत बसले होते. त्या दोघांना वीज उपकेंद्राच्या पुढे असलेल्या स्मशानभूमी शेडच्या बाजूला काळ्या रंगाचा मोठा प्राणी दिसून आला.
कशेळे गावाची गुरचरण असलेल्या त्या भागात मग दोघांनी आपली दुचाकी घेऊन त्या प्राण्याचे आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करण्यासाठी पाठलाग सुरू केला. सध्या पाऊस पडत असल्याने रात्री तेथे असलेला नाला ओलांडून तो प्राणी पलीकडे गेल्याने चंदू राणे आणि सुरक्षा रक्षक यांना पुढे जाता आले नाही, परंतु त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला प्राणी हा रानगवा असल्याचे स्पष्ट झाल्याने प्राणीमित्र आणि प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे