मुंबईत रंगणार रागिणींचा रणसंग्राम

| मुंबई | प्रतिनिधी |
चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या विद्यमाने दि. 8 ते 11 मार्च या कालावधीत महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणसंग्राम रागीणींचा या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्गावरील स्व. दिनकर खाटपे क्रीडांगणावर होणार्‍या या स्पर्धेत मुंबईतील 16 नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेची तयारी जोरदार सुरू असून, त्याकरिता एक क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील. या स्पर्धेतील विजयी, उपविजयी व उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना चंद्रोदय मंडळाच्या वतीने रणरागिणी चषक व रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंतिम विजेत्या व उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई व पकड यांना देखील खास पारितोषिक बहाल करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. 8 मार्च रोजी सायं. 7 वाजता स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कारप्राप्त माया मेहेर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ, रेखा देवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठेकर यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली.

Exit mobile version