नैसर्गिक रंगांची उधळण करत रंगपंचमी

। तळा । वार्ताहर ।
शहरात नैसर्गिक रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली. होली नंतर येणारी रंगपंचमी ही शिमग्यातील शेवटचा सण म्हणून साजरा केला जातो. मुबंई, पुणे सारख्या शहरात होळीच्या दुसर्‍या दिवशीच रंगपंचमी साजरी करतात मात्र ग्रामीण भागात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. तळा बाजारपेठेत सकाळपासूनच बच्चे कंपनीने हातात रंग घेऊन दुकानदारांकडे पोस्त(पैसे)मागायला सुरुवात केली होती. रंगपंचमीत लहानमुलांसह तरूण वर्ग तसेच महिलांनीही सहभाग घेतला होता. मुलांनी गोळा केलेला अर्धा पोस्त (पैसे) महिलांना दिला जातो व त्या पैशातून महिला मंडळ ज्या ठिकाणी होळी लागते त्या ठिकाणी घुगर्‍या शिजवून प्रत्येकी घरी त्या वाटल्या जातात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच आवडीने जपली जाते. शहरात पाण्याचा वापर टाळून साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी तरुणांनी रंगपंचमी साजरी करताना चायना मेड कलरचा वापर न करता नैसर्गिक व आरोग्यास पोषक रंगाचा वापर करणे पसंत केले.

दक्षिण रायगडमध्ये रंगांची उधळण
रंगीबेरंगी झालेले चेहरे, रंगाने भरलेल्या पाण्याच्या पिचकार्‍या, एकमेकांवर फोडले जाणारे रंगांचे फुगे आणि विविध रंगांची एकमेकांवर उधळण करत महाडसह दक्षिण रायगडमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी धुळवडीच्या दिवशीच रंगांची उधळण करण्याची परंपरा असली तरीही रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागांमध्ये पंचमीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते.
महाड व परिसरात दुपारी बारानंतर रंगपंचमी खेळली जात असल्याने सकाळी सुरू असलेले व्यवहार दुपारनंतर ठप्प झाले. आज रविवार असल्याने बच्चेकंपनीला सुट्टी होती. त्यामुळे सकाळपासूनच सर्वजण रंगात हरवून गेले होते. शहरातील सर्व दुकाने दुपारी काहीकाळ रंगपंचमीमुळे बंद होती. रंग खेळणार्‍यांशिवाय अन्य कोणी रस्त्यावर फिरत नव्हते. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकांत तर इमारतीखाली अनेक जण एकमेकांवर रंगांची उधळण करत होते. अनेक ठिकाणी चौकाचौकांत तरुणांनी वाहनचालकांना अडवत ङ्गबुरा ना मानो, होली हैफ, असे म्हणत रंगांची उधळण केली; तर लहान मुलांनी रस्त्यावर गाड्या अडवून पोस्त वसूल केले. महाड, बिरवाडी, पोलादपूर, गोरेगाव, माणगाव, म्हसळा, तळा तालुक्यात ग्रामीण भागातही रंगपंचमीचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम होता.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
काहींनी रंगपंचमी असल्याने बाहेर जाण्याचे टाळले होते. बाजारपेठेतही आज सर्वच ठिकाणी रंगपंचमीचा जल्लोष सुरू होता. व्यापार्‍यांनी दुपारी आपली दुकाने बंद ठेवून सणाचा आनंद लुटला. दुपारनंतर उत्साहाला उधाण आले आणि बघताबघता सर्वच ठिकाणी रंगीबेरंगी चित्र दिसू लागले. आपल्याला रंगवू नये म्हणून काहीजण बचावात्मक पवित्रा घेऊन मार्ग काढत घर गाठत होते.

Exit mobile version